
ग्रामीण भागातील लोकांना बचत गटामार्फत पत्रावळीनिर्मिती, रंग उद्योग, लाख उद्योग, दोरनिर्मिती उद्योग, औषधीनिर्मिती उद्योग या वृक्षामुळे सुरू करणे शक्य आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतः या झाडाची लागवड होणे आवश्यक आहे. "ल्यूटीया' या जातीची फुले केशरी लाल ऐवजी पिवळी असतात. ही झाडे बागेमध्ये मुद्दामहून लावली जातात. "पळस वेल' नावाची दुसरी प्रजाती आहे यास शास्त्रीय भाषेत "ब्युटीया सुपरबा' म्हणतात. याच्या फुलापासून पिवळा रंग मिळतो.
अढळ : "फाबेशिया' कुळातील या वृक्षाला शास्त्रीय भाषेत "ब्युटीया मोनोस्पर्मा' या नावाने ओळखले जाते. हा मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष भारतातील उष्ण व समशीतोष्ण जंगलामध्ये मुख्य वृक्ष म्हणून विंध्य, सह्याद्री, हिमालय पायथ्याचे जंगल इ. ठिकाणी आढळतो. ब्रह्मदेश, श्रीलंकेतही हा वृक्ष आढळतो. फुले लाल, केशरी रंगाची आणि पाने गळून गेलेल्या झाडावर येतात. त्यामुळे जंगलात जाळ निघाल्याचा भास उन्हाळ्यात होतो म्हणून या वृक्षास इंग्रजीत "फ्लेमऑफ फॉरेस्ट' या नावाने ओळखले जाते. या वृक्षाचा डिंकाचा व्यापार "बेंगाल किनो' या नावाने चालतो म्हणून इंग्रजीत दुसरे नाव "बेंगाल किनो' असे आहे. हिंदीत ढाक, पलस, तेसू आणि संस्कृतमध्ये "पलाश' म्हणून पळसाच्या झाडाला ओळखले जाते. पळसाचे झाड 10-15 मीटरपर्यंत वाढते. पाने हिवाळ्यात गळून पडतात आणि वसंतात नवी येतात. ती येण्यापूर्वीच फुले येतात. फुले केशरी लाल गुच्छाने असतात. फुले पक्ष्यांच्या आकाराची दिसतात म्हणून यास "किंशुक' असेही म्हणता. शेंगांमध्ये एकच चपटे बी असते बीचा रंग काळसर बदामी असतो.

उपयोगी भाग ः पाने, फुले, बिया, मुळे आणि खोड.रासायनिक घटक ः या वनस्पतीच्या भागामध्ये "बट्रीन', आयसोबट्रीन, कोरीओपोसीन, सल्फुरेन इ. ग्लायकोसाईड्स असतात.
उपयोग ः पानांचा उपयोग पुरातन काळापासून द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी होत आला आहे. पळसाची मुळे गरम पाण्यात उकळून सालीपासून धागे काढतात. त्यांचे दोरखंडे बनविली जातात. बियांपासून पिवळे तेल मिळते. तेही औषधात वापरले जाते. फुलापासून केशरी लाल रंग मिळतो त्याचा उपयोग कपड्यांना रंग देण्यासाठी होतो. खोडाचा उपयोग खोकी-फळ्या करण्याकरिता केला जातो. पळसाच्या खोडावर लाखेचे किडे चांगले वाढतात. खोडामधून डिंक मिळतो. तो लालसर रंगाचा असतो. डिंक आणि बियांचे चूर्ण पोटातील किडे पाडण्याकरिता केला जातो. महिलांमधील मासिक विकारात डिंकाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो म्हणून यास "कमरकस गोंद' असेही म्हणतात. गर्भाशयाचे टॉनिक म्हणूनही वापर केला जातो. मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार इ. मध्ये फुलांचा वापर केला जातो.
No comments:
Post a Comment