Monday, March 21, 2011

कुक्कुटपालन व्यवसाय मार्गदर्शन

                  




कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याविषयीचे शास्त्रोक्‍त ज्ञान तसेच त्यातील तांत्रिक गोष्टींची माहिती असणे आवश्‍यक आहे. साधारणपणे कुक्कुटपालन हे अंडी उत्पादनासाठी व मांसासाठी (ब्रॉयलर) करता येते. अंड्यासाठी कुक्कुटपालन करायचे असल्यास विविध जातींच्या कोंबड्या पाळता येतात. जसे गावठी कोंबड्या, व्हाइट लेगहॉर्न, ऱ्होड आयलॅंड रेड इत्यादी. अंड्यावरील कोंबड्यांचे वयोगटानुसार व्यवस्थापन करताना एक-सहा आठवड्यांपर्यंत लहान पिलांची निगा राखणे, 6-20 आठवड्यांपर्यंत शरीर वाढीसाठी आणि 21 आठवड्यांपासून पुढे पक्ष्यांचा अंडी उत्पादनाचा काळ असतो.
अशा पद्धतीने अंड्यावरील कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे. कोंबड्यांना खाद्य व्यवस्थापन करताना वयोगटानुसार कोंबड्यांना चीक मॅश, ग्रोअर मॅश व लेअर मॅश द्यावे. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व सुव्यवस्थित व्यवस्थापनासाठी प्रत्येक पक्ष्याला वयानुसार साधारणपणे 1.5 ते 2.0 चौ. फूट जागा असावी. शहरी व ग्रामीण भागात कोंबडीच्या मांसासाठी (ब्रॉयलर कोंबड्यांसाठी) मागणी वाढत आहे.

मांसासाठी कुक्कुटपालन करणे सोपे व फायदेशीर ठरते. साधारणपणे पिल्ले जन्मल्यानंतर आठ आठवड्यांत विक्री योग्य होतात. पक्ष्यांची वाढ भराभर होत असल्याने असे पक्षी मांसासाठी वाढविणे किफायतशीर ठरते. कोंबडीच्या मांसासाठी विविध प्रकारच्या जातींचे पालन करता येते; परंतु भराभर वाढणाऱ्या व जास्त वजन देणाऱ्या जाती निवडाव्यात. मांसासाठी कोंबडीपालन करण्यासाठी व व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी शास्त्रोक्त व्यवस्थापन, आहार व्यवस्थापन, वेळच्या वेळी लसीकण व बजारपे महत्त्वाची आहे. साधारणपणे एका कोंबडीस एक चौ. फूट जागा पुरेशी होते.

कोंबडी फार्मची आखणी पूर्व-पश्‍चिम असावी. हवेशीर व आवाजापासून दूर असावी. कोंबड्यांना बसण्यासाठी खाली लाकडी भुसा किंवा शेंगांची टरफले यांचा पाच-दहा सें.मी.चा थर द्यावा. जेणेकरून ज मिनीचा उबदारपणा टिकेल व कोंबड्यांची विष्ठा त्यात कालवली जाईल. कोंबडी घरात ऊब टिकण्यासाठी लाइटची व्यवस्था करावी. साधारणपणे दोन-तीन वॉट उष्मा प्रत्येक पक्ष्याला मिळावी या दृष्टीने व्यवस्था करावी. कुक्कुटपालनासंबंधी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
- 022-24131180, 24137030, विस्तार क्र.136
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई