Tuesday, February 15, 2011

तुतीपासून प्रक्रिया उत्पादने

             
दक्षिण कोरियामध्ये तुती पानांच्या पावडरचा वापर करून विविध प्रकारची चॉकलेट्‌स, व्हेपर्स बनवितात. तुतीमध्ये अनेक जीवनसत्त्वांचा समावेश आहे. 100 ग्रॅम तुती पानांमध्ये 26.1 मिलिग्रॅम जीवनसत्त्व "अ', 0.8 मिलिग्रॅम बी-1, 4.6 मिलिग्रॅम बी-2, जीवनसत्त्व क (सी) 17.79 मिलिग्रॅम आहे; तसेच लोह, कॅल्शिअमही आहे. त्यामुळे लहान मुलांनाही या घटकांचा फायदा होतो. दहा ग्रॅम तुती व्हेपर्सपासून 470 किलो कॅलरी उष्मांक, तर "अ' जीवनसत्त्व 75 (आय यू), 120 मिलिग्रॅम कॅल्शिअम मिळते.
तुती पानांचा साबण तुती पानांच्या पावडरपासून साबण बनविला जातो. हा साबण रक्त शुद्धीकरण / रक्ताभिसरण वाढवितो. त्वचेचा मुलायमपणा वाढवितो. नैसर्गिक तत्त्व / घटकांपासून बनविलेला असल्याने चांगला फेस होतो, त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

मधुमेहींसाठी गुणकारी तुतीच्या गोळ्या दक्षिण कोरियामध्ये अनेक कंपन्या तुतीपासून विविध औषधे बनवितात. पानांच्या पावडरपासून मधुमेहावरील गोळ्या बनविल्या जातात. तुतीमध्ये उपलब्ध औषधी गुणधर्मांचा औषधासाठी पुरेपूर उपयोग करण्यात आला आहे. तुतीमधील डी-ऑक्‍सिनोजेरीमायसीन (डीएनजे) हे रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयोगी आहे.

तुती पानांचा खाद्य म्हणून उपयोग आपल्या देशात प्रथिनयुक्त अन्नपदार्थांची कमतरता आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुपोषण होते. जीवनसत्त्व "अ'ची कमतरता आणि ऍनिमिया मोठ्या प्रमाणात आढळतो. मानवाच्या शरीरातील पेशी आणि जैवरसायनांचा प्रथिने हा महत्त्वाचा घटक आहे. प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना मर्यादा आहेत. अंडी, मटण, मांस, मासे यांची उपलब्धता आणि किंमत यालाही मर्यादा आहेत, त्यामुळे वनस्पतिजन्य प्रथिनांची मोठी गरज आहे. तुती पानांमध्ये (20-25 टक्के) कॅल्शिअम, लोह, पोटॅशियम, कॅरोटीन, फॉस्फरस, जीवनसत्त्व अ, ब, क मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तुती पानांमध्ये अनेक महत्त्वाची अमिनो ऍसिड्‌स जसे - अस्पार्टीक ऍसिड, मिथीओनाईन, थ्रीओनाईन, लायसीन अर्जेनाईन, हिस्टीडीन, लुसीन, प्रोलीन आणि ट्रीपटोफॅन उपलब्ध आहेत. दक्षिण कोरिया, चीनमध्ये तुतीचा अन्न प्रक्रियांमध्ये वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मानवाच्या आहारामधील विविध पदार्थांत तुतीची पाने आणि पावडर वापरण्यात येते. त्यापासून नुडल्स, बिस्कीट्‌स, ब्रेड, बेक्‍ड ब्रेड, बीनकर्ड, केक, ऑम्लेट, कुल्फी, आइस्क्रीम इ. पदार्थ बनविले जातात. भारतातही तुती पानांचा वापर थोड्याफार प्रमाणात अन्नपदार्थांत जसे - भाजी आणि पराठ्यांसाठी केला जातो. पानांच्या पावडरचा वापर इडली-डोसा, पराठा, चपाती, तर बेकरी पदार्थ केक आणि बिस्कीट यांमध्ये होतो.

तुती पानांची पावडर तुती पानांमध्ये नैसर्गिकरीत्या त्वचेला मुलायम ठेवण्याचे गुणधर्म आहेत, त्यांचा विचार करून दक्षिण कोरिया, थायलंड, जपान इत्यादी अनेक देशांत तुती पानांच्या पावडरचा वापर करून विविध औषधे, सौंदर्य प्रसाधनांसाठी त्याचा वापर केला जातो. विविध नैसर्गिक रंगद्रव्ये करण्यासाठीही याचा वापर केला जातो.

ज्वारीपासून बनवा पापड,लाह्या,बिस्किटे

भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक (रेझिस्टंट स्टार्च), शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात. ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक, रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबीवरती अवलंबून असते. आपल्याकडे प्रामुख्याने ज्वारीचा उपयोग ज्वारीची भाकरी म्हणूनच मोठ्या प्रमाणात करतात. तसेच काही वाणांचा उपयोग लाह्या, हुरडा, पापड, बिस्किटे अशा खाद्य पदार्थांसाठी होऊ शकतो.
ज्वारीचे विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रथम त्याचे बारीक पिठामध्ये रूपांतर केले जाते. ज्वारीच्या दाण्यामध्ये लायसीन हे अमिनो आम्ल अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे ज्वारीच्या प्रथिनांची प्रत कमी दर्जाची समजली जाते, तसेच पिठास खरबरीतपणा अधिक (कोर्स) असल्यामुळे लोकांची पसंती कमी असते. या अडचणीवर मात करण्यासाठी, उपलब्ध ज्वारीची उपयोगिता किंवा मूल्यवर्धन वाढविण्यासाठी ज्वारीच्या पिठात ज्वारीचेच माल्ट किंवा आंबविलेले पीठ वापरणे फायद्याचे ठरते. ज्वारीमध्ये लायसीन आणि मिथिओनाईन ही अत्यावश्‍यक अमिनो आम्ले तसेच ज्वारीच्या पिठाची पौष्टिक मूल्ये ज्वारीला मोड आणून किंवा त्याच्या पिठाचे आंबविणे करून (फर्मिनटेशन) वाढविता येतात. ज्वारी दाणे दहा तास पाण्यात भिजवून नंतर 24 तास मोड येण्यास ठेवले असता चांगले माल्टिंग होते
ज्वारीच्या पिठामध्ये सोयाबीनचे माल्टयुक्त पीठ, नाचणीचे माल्टयुक्त पीठ मिसळून त्यापासून पदार्थ बनविल्यास मानवी शरीरास आवश्‍यक असणारी सर्व अमिनो आम्ले आणि इतर घटक पदार्थ विपुल प्रमाणात उपलब्ध होतात. मूल्यवर्धन करून तयार केलेले ज्वारीचे पीठ चांगल्या प्रकारे व्हॅक्‍यूम पॅक केले असता त्याची साठवणक्षमता सहा महिन्यांपर्यंत अत्यंत चांगली राहते. अशा पिठापासून आपणास केव्हाही भाकरी, पराठे, थालीपीठ, वडे किंवा इतर पदार्थ तयार करता येतात. अशा प्रकारच्या पिठापासून बनविलेल्या पदार्थांपासून त्वरित ऊर्जा, प्रथिने व इतर जीवनसत्त्वे उपलब्ध होऊन पचनक्रियेस वेळ न लागता शरीरास लवकर उपलब्ध होतात.
हुरडा ः

रब्बी हंगामात थंडीच्या मोसमात ज्वारीचे दाणे हिरवट, परंतु दुधाळ अवस्थेच्या पुढे जाऊन पक्व होण्याच्या अगोदरच्या अवस्थेत (सॉफ्ट डफ) असतात, त्या वेळेला भाजलेल्या (होरपळलेल्या) अवस्थेत अतिशय चवदार, मऊ व गोडसर लागतात, त्यास ज्वारीचा हुरडा असे म्हणतात. हिरव्या दाण्यांचा हुरडा अतिशय चांगला लागतो, कारण त्या वेळेला त्या दाण्यांमध्ये मुक्त अमिनो आम्ले, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्त्वे यांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे असे दाणे गोवऱ्यांच्या उष्णतेवरती भाजले असता दाण्यांतील विविध रासायनिक घटकांची विशिष्ट रासायनिक प्रक्रिया होऊन "कॅरमलायझेशन'मुळे दाण्यांस एक प्रकारची स्वादिष्ट चव प्राप्त होते. हुरड्यामध्ये लिंबू, मीठ, साखर, तिखट, मसाला यांसारखे पदार्थ वापरून त्याची चव द्विगुणित करता येते. खास हुरड्यासाठी गोडसर, रसाळ आणि भरपूर दाणे असणाऱ्या फुले उत्तरा या वाणाची शिफारस संशोधन केंद्रामार्फत करण्यात आलेली आहे. सध्या ज्वारीच्या हुरड्याची लोकप्रियता वाढत चाललेली आहे.



लाह्या ःज्वारीपासून लाह्या बनविण्यासाठी प्रामुख्याने त्या ज्वारीच्या दाण्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण अधिक असणे गरजेचे आहे. कारण अशा प्रकारचे दाणे अति उच्च तापमानात एकदम गरम केले असता दाण्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते दाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे दाण्यातील स्टार्च फुलला जाऊन त्याचा बस्ट होतो व पुढे त्याची लाही तयार होते. जेवढ्या प्रमाणात स्टार्च दाण्यामध्ये अधिक असेल, त्या प्रमाणात लाहीचे आकारमान होते. त्यासाठी उच्च तापमानाची आवश्‍यकता असते. लाह्यांसाठी वॅक्‌सी ज्वारीच्या वाणाची निवड करावी, कारण त्यापासून मोठ्या आकारमानाच्या पांढऱ्या शुभ्र लाह्या मिळतात. ज्वारीच्या लाह्या सध्या "लोकॅलरी हाय फायबर स्नॅक फूड' म्हणून लोकप्रिय आहेत. या लाह्या अधिक चवदार होण्यासाठी विविध मसाल्यांचे पदार्थ वापरून चविष्ट लाह्या तयार करणे, तसेच या लाह्या अधिक काळ चांगल्या कुरकुरीत चवदार राहण्यासाठी व्हॅक्‍यूम पॅकेजिंग तंत्राचा वापर करण्याचे प्रयोग चालू आहेत. काही भागामध्ये ज्वारीच्या लाह्यांचे पीठ करून ते ताकाबरोबर खाण्याची प्रथा आहे. मक्‍याच्या लाह्यांप्रमाणेच ज्वारीच्या लाह्या करून वर्षभर विकण्याचा व्यवसाय करणे शक्‍य होऊ शकते


पापड, भातवडी ःज्वारीमधील आहारमूल्यांचा उपयोग मानवी शरीरास होण्यासाठी ज्वारीचे उत्कृष्ट पौष्टिक पापड किंवा भातवडी बाजारात आणणे गरजेचे आहे. ज्वारीच्या माल्टयुक्त पिठापासून, तसेच नाचणीच्या, सोयाबीनच्या माल्टयुक्त पिठापासून पापड किंवा भातवडी तयार केली असता त्यापासून भरपूर प्रमाणात आहारमूल्ये मिळू शकतात. खेडेगावात ज्वारीचे दाणे आंबवून त्यापासून चीक तयार करून त्यामध्ये आवश्‍यकतेनुसार मीठ टाकून शिजवतात आणि नंतर पातळ कापडावर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर पातळ थर देऊन पापडाच्या आकाराच्या भातवड्या तयार केल्या जातात. या भातवड्या भाजून किंवा तेलात तळून स्नॅक फूड म्हणून वापरल्या जातात. याप्रमाणेच ज्वारीचे पापड तयार करताना पापडखार आणि इतर मसाल्याचे पदार्थ वापरून लहान-मोठ्या आकाराचे पापड तयार करतात. हाय फायबर, लो कॅलरीज, हाय प्रोटिनयुक्त माल्टच्या पापडांचा किंवा भातवड्यांचा आरोग्याच्या दृष्टीने निश्‍चितच चांगला फायदा होऊन त्यास चांगली मागणी मिळू शकेल.
िस्कीट आणि कुकीजबिस्कीट आणि कुकीजची निर्मिती प्रामुख्याने गव्हाच्या मैद्यापासून केली जाते; परंतु काही प्रयोगाअंती असे दिसून आले आहे, की मैद्यामध्ये साधारणतः 20 टक्‍क्‍यांपर्यंत आपण ज्वारीचे पीठ वापरून बिस्किटे व कुकीज चांगल्या प्रतीची करू शकतो. मधुमेह पेशंटसाठी हाय फायबर, लो कॅलरीज बिस्कीट किंवा कुकीज बनविण्यासाठी साखरविरहित, क्रीमविरहित, प्रथिनयुक्त असे घटक पदार्थ वापरता येतील, तसेच त्याची पौष्टिक मूल्ये वाढविण्यासाठी नाचणी, सोयाबीन, ज्वारीच्या माल्ट पिठाचा वापर करता येईल. अशा प्रकारच्या बिस्किटांची निर्मिती करून ज्वारीचे मूल्यवर्धित पदार्थांत रूपांतर करता येईल.

 डॉ. उत्तम चव्हाण, 02426- 243253

Saturday, February 5, 2011

पूरक धंद्यासाठी पळस


            पळस या वृक्षाचे अनेक उपयोग आहेत. ग्रामीण भागातील लोकांसाठी पूरक धंदे देणाऱ्या या झाडाची लागवड म्हणावी तशी केली जात नाही. या वृक्षाचा उपयोग द्रोण, पत्रावळी, बिडीनिर्मितीसाठी, फुलांचा उपयोग रंग काढण्यासाठी, मुळांचा वापर धागे मिळविण्यासाठी, तसेच खोडाचा उपयोग लाकूड म्हणून, तसेच या वृक्षापासून डिंक, लाख इ. उपयुक्त पदार्थ मिळत असल्याने या वृक्षांची लागवड पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात करणे आवश्‍यक आहे.
ग्रामीण भागातील लोकांना बचत गटामार्फत पत्रावळीनिर्मिती, रंग उद्योग, लाख उद्योग, दोरनिर्मिती उद्योग, औषधीनिर्मिती उद्योग या वृक्षामुळे सुरू करणे शक्‍य आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतः या झाडाची लागवड होणे आवश्‍यक आहे. "ल्यूटीया' या जातीची फुले केशरी लाल ऐवजी पिवळी असतात. ही झाडे बागेमध्ये मुद्दामहून लावली जातात. "पळस वेल' नावाची दुसरी प्रजाती आहे यास शास्त्रीय भाषेत "ब्युटीया सुपरबा' म्हणतात. याच्या फुलापासून पिवळा रंग मिळतो.

अढळ : "फाबेशिया' कुळातील या वृक्षाला शास्त्रीय भाषेत "ब्युटीया मोनोस्पर्मा' या नावाने ओळखले जाते. हा मध्यम उंचीचा पर्णझडी वृक्ष भारतातील उष्ण व समशीतोष्ण जंगलामध्ये मुख्य वृक्ष म्हणून विंध्य, सह्याद्री, हिमालय पायथ्याचे जंगल इ. ठिकाणी आढळतो. ब्रह्मदेश, श्रीलंकेतही हा वृक्ष आढळतो. फुले लाल, केशरी रंगाची आणि पाने गळून गेलेल्या झाडावर येतात. त्यामुळे जंगलात जाळ निघाल्याचा भास उन्हाळ्यात होतो म्हणून या वृक्षास इंग्रजीत "फ्लेमऑफ फॉरेस्ट' या नावाने ओळखले जाते. या वृक्षाचा डिंकाचा व्यापार "बेंगाल किनो' या नावाने चालतो म्हणून इंग्रजीत दुसरे नाव "बेंगाल किनो' असे आहे. हिंदीत ढाक, पलस, तेसू आणि संस्कृतमध्ये "पलाश' म्हणून पळसाच्या झाडाला ओळखले जाते. पळसाचे झाड 10-15 मीटरपर्यंत वाढते. पाने हिवाळ्यात गळून पडतात आणि वसंतात नवी येतात. ती येण्यापूर्वीच फुले येतात. फुले केशरी लाल गुच्छाने असतात. फुले पक्ष्यांच्या आकाराची दिसतात म्हणून यास "किंशुक' असेही म्हणता. शेंगांमध्ये एकच चपटे बी असते बीचा रंग काळसर बदामी असतो.
                                     
उपयोगी भाग ः पाने, फुले, बिया, मुळे आणि खोड.रासायनिक घटक ः या वनस्पतीच्या भागामध्ये "बट्रीन', आयसोबट्रीन, कोरीओपोसीन, सल्फुरेन इ. ग्लायकोसाईड्‌स असतात.
उपयोग ः पानांचा उपयोग पुरातन काळापासून द्रोण, पत्रावळी बनविण्यासाठी होत आला आहे. पळसाची मुळे गरम पाण्यात उकळून सालीपासून धागे काढतात. त्यांचे दोरखंडे बनविली जातात. बियांपासून पिवळे तेल मिळते. तेही औषधात वापरले जाते. फुलापासून केशरी लाल रंग मिळतो त्याचा उपयोग कपड्यांना रंग देण्यासाठी होतो. खोडाचा उपयोग खोकी-फळ्या करण्याकरिता केला जातो. पळसाच्या खोडावर लाखेचे किडे चांगले वाढतात. खोडामधून डिंक मिळतो. तो लालसर रंगाचा असतो. डिंक आणि बियांचे चूर्ण पोटातील किडे पाडण्याकरिता केला जातो. महिलांमधील मासिक विकारात डिंकाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो म्हणून यास "कमरकस गोंद' असेही म्हणतात. गर्भाशयाचे टॉनिक म्हणूनही वापर केला जातो. मूत्राशयाचे विकार, किडनीचे विकार इ. मध्ये फुलांचा वापर केला जातो.

Food Processing is a future need

नारळप्रक्रियेतून लघु उद्योगांची उभारणी शक्‍य
कोकणातील महत्त्वाचे बागायती पीक म्हणजे नारळ. केवळ शहाळे आणि नारळ उत्पादन ही संकल्पना मागे पडत असून, नारळाची विविध उत्पादने तयार करण्यावर भर दिला जात आहे.

1) खोबरे ः नारळ 11 ते 12 महिन्यांचे पक्व झाल्यानंतर ते खोबरे तयार करण्यासाठी वापरतात. ताज्या खोबऱ्यात 50 ते 55 टक्के तसेच वाळलेल्या खोबऱ्यामध्ये पाच ते सहा टक्के पाणी असते. नारळ फोडून वाट्या उन्हामध्ये सात ते आठ दिवस वाळवाव्यात. खोबरे वाळविण्यासाठी सौर वाळवणी यंत्राचा वापर करता येतो.
2) गोटा खोबरे ः गोटा खोबरे 12 महिने पक्वतेच्या नारळापासून तयार करता येते. छपराखाली बांबूचे मचाण करून त्यावर 8 ते 12 महिने नारळ साठवितात. या कालावधीत सर्व पाणी आटते, असे नारळ हलविले असता गुडगुड आवाज येतो. नारळ फोडून करवंटीपासून खोबरे वेगळे केले जाते. अशा प्रकारे गोटा खोबरे तयार होते.
3) डेसिकेटेड खोबरे ः डेसिकेटेड कोकोनट बनविण्यासाठी परिपक्व नारळ सोलून, त्याचे दोन तुकडे करावे. खोबरे करवंटीपासून वेगळे करून, खोबऱ्यावर असलेली तपकिरी रंगाची साल वेगळी केली जाते. अशा पद्धतीने जवळपास 12 टक्के नको असलेला भाग काढून टाकला जातो. खोबऱ्याचे बारीक तुकडे करून स्वच्छ पाण्याने ते धुतले जातात. यामुळे खोबऱ्याला चिकटलेला नको असलेला भाग काढला जातो. हे तुकडे ठराविक तापमानाला उकळत्या पाण्यामध्ये ठेवतात. नंतर या तुकड्यांचा किस करून वाळवणी यंत्रामध्ये वाळविले जातात. वाळविलेला किस जशाच्या तसा प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये हवाबंद केला जातो किंवा त्याची भुकटी करून हवाबंद केला जातो. मिठाई, इतर खाद्य कारखाने, चॉकलेट, कॅन्डीमध्ये याचा वापर केला जातो.
4) नारळाचे दूध आणि दुधाचे पदार्थ ः पक्व नारळाच्या खोबऱ्यापासून दूध तयार करतात. डेअरी क्रीमला पर्याय म्हणून वापर होतो. गाईच्या दुधाच्या तुलनेत यात स्निग्धांश भरपूर असतात, परंतु प्रोटिन, साखर कमी असते.
5) नारळ मलई ः नारळाच्या दुधापासून घट्ट मलई तयार केली जाते. वेगवेगळ्या करी, गोड पदार्थ, पुडिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो, तसेच बेकरीचे पदार्थ तयार करण्यासाठीही याचा वापर केला जातो.
6) पक्व नारळातील पाणी ः या पाण्यात दोन टक्के साखर, 5.4 टक्के एकूण विद्राव्य घटक, 0.5 टक्का खनिजे, 0.1 टक्का प्रोटिन आणि 0.1 टक्का स्निग्धांश असतात. या पाण्यापासून व्हिनेगार तयार केले जाते.
7) शहाळ्याचे पाणी ः शहाळ्याच्या पाण्यात सर्वांत जास्त पालाश आणि खनिजे असतात. सात महिन्यांच्या शहाळ्याच्या पाण्यात साखरेचे प्रमाण सर्वाधिक असते. "चौघाट ऑरेंज ड्‌वार्फ' ही नारळाची जात शहाळ्याच्या पाण्यासाठी उत्कृष्ट आहे. अनेक आजारांत शहाळ्याचे पाणी रुग्णाला दिले जाते. विशेषतः हगवण, जुलाब, उलटी व पोटाचे विकार यांत मोठ्या प्रमाणात ते वापरले जाते.
8) स्नोबॉल टेंडर नट ः यामध्ये शहाळे नारळाचे सोडण, करवंटी आणि खोबऱ्यावरील लाल साल काढून टाकली जाते. आठ महिने वयाच्या नारळापासून स्नोबॉल टेंडर नट तयार केले जातात.
9) खोबरेल तेल ः सुक्‍या खोबऱ्यापासून 65 ते 70 टक्के (सरासरी 60.5 टक्के) खोबरेल तेल मिळते. भारतामध्ये तेलाचा उपयोग खाण्यासाठी - 40 टक्के, स्वच्छतागृह साफ करणारे पदार्थ/ सौंदर्यप्रसाधने - 46 टक्के, साबण तयार करणे - 14 टक्के एवढा केला जातो.
10) खोबऱ्याची पेंड ः सुक्‍या खोबऱ्यापासून तेल काढल्यानंतर सुमारे 35 ते 36 टक्के चोथा शिल्लक राहतो. त्याचा जनावरांचे खाद्य म्हणून वापर करता येतो, परंतु प्रत्येक जनावरास दिवसाला दोन ते अडीच किलोपेक्षा जास्त पेंड देऊ नये, त्यामुळे दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण वाढते; तसेच कोंबडी खाद्यासाठीही याचा उपयोग होतो.
11) करवंटी ः देशात अंदाजे 1.7 दशलक्ष टन करवंटी दर वर्षी उपलब्ध होते. करवंटीपासून कोळसा, ऍक्‍टिव्हेटेड कार्बन, करवंटी भुकटी, भांडी, शोभेच्या वस्तू, आइस्क्रीम कप, बटण अशी विविध उत्पादने तयार केली जातात.
12) करवंटी कोळसा ः करवंटीपासून 30 टक्के म्हणजेच 1000 करवंट्यांपासून 30 किलो, तर 30,000 करवंट्यांपासून एक टन कोळसा मिळतो.
13) ऍक्‍टिव्हेटेड कार्बन ः करवंटी कोळशापासून ऍक्‍टिव्हेटेड कार्बन तयार केला जातो. तीन टन करवंटी कोळशापासून अंदाजे एक टन ऍक्‍टिव्हेटेड कार्बन मिळतो. याचा उपयोग वनस्पती तेल शुद्ध आणि साफ करण्यासाठी, पाण्याचे शुद्धीकरण, द्रावकाचा उतारा, सोन्याचा उतारा, विषारी वायूपासून संरक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस मास्कमध्ये केला जातो.
14) करवंटीची भुकटी ः स्वच्छ करवंटी दळून त्याची भुकटी तयार करतात. तिचा उपयोग लाकडाच्या भुश्‍शाऐवजी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, बकेलाइट कारखान्यात, फिलर म्हणून मच्छर अगरबत्ती आणि इतर अगरबत्ती, फिनॉलीन पावडरमध्ये आणि प्लायवूड लॅमिनेटेड बोर्डात वापरली जाते.
ः 02352-235077
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी
ः 02358-280233, 280338
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी

नारळापासून घरच्या घरी रोपे कशी तयार करावीत?
                नारळापासून घरच्या घरी रोपे तयार करता येतात, मात्र त्यासाठी चांगल्या नारळाच्या झाडाची निवड करणे महत्त्वाचे असते. ज्या झाडाची निवड केली ते चांगले उत्पादन देणारे असावे, म्हणजे दर्जेदार रोपे तयार होतील. रोपे तयार करण्यासाठी 11-12 महिन्यांचे पक्व झालेले नारळ काढून घ्यावेत. झाड उंच असल्यास फळे काढताना ती जमिनीवर आदळणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण आदळलेल्या फळाला जखम होऊ शकते.
नारळ काढल्यानंतर एक महिनाभर सावलीत ठेवावे. साठवण अशा रीतीने करावी, की जेणेकरून नारळातील पाणी आटणार नाही. फक्त वरील आवरण कडक होईल. त्यानंतर साधारण दहा फूट रुंद व 50 फूट लांबीचे सपाट वाफे करून घ्यावे. वाफ्यात दोन ओळीत सव्वा फूट व दोन नारळात एक फूट अंतर ठेवून नारळाच्या आकाराप्रमाणे केलेल्या खड्ड्यात नारळ उभा राहील अशा रीतीने ठेवावा. त्यावर माती टाकावी. माती टाकताना नारळाचे वरचे टोक थोडेसे दिसेल अशा पद्धतीने ठेवावे.
नारळांच्या संख्येप्रमाणे पाच-सात वाफे तयार करावेत. वाफ्यात लागवड केल्यानंतर पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, जेणेकरून त्या वाफ्यात ओलावा टिकून राहील. अंदाजे तीन साडे तीन महिन्यांत उगवण सुरू होते. पाच महिन्यांत नारळाला कोंब येतो. चांगल्या प्रतीचे रोप तयार होण्यास नऊ ते 12 महिने लागतात. यासंबंधी अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.
ः 02352- 235077
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,जि. रत्नागिरी